अहिल्यानगरमाजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंची उमेदवारी आमदार बच्चू कडू आणि आमदार शंकरराव गडाखांच्या...

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंची उमेदवारी आमदार बच्चू कडू आणि आमदार शंकरराव गडाखांच्या संमतीने?

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

विधानसभेच्या निवडणुकीत भरण्यात आलेले उमेदवारी अर्ज उद्या (दि. ४) दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेण्यात येणार आहेत. स्वतंत्र नेवासे विधानसभा मतदारसंघात ३३ जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. यामध्ये भाजपच्या तिकिटावर यापूर्वी आमदार झालेले माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचाही समावेश आहे. माजी आमदार मुरकुटे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रहार पक्षाच्यावतीने जो उमेदवारी अर्ज भरला आहे, त्या उमेदवारी अर्जाला या मतदारसंघाचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख

यांची संमती असल्याची जोरदार चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे.

विद्यमान आमदार गडाख आणि आमदार बच्चू कडू

यांची मैत्री सर्वश्रृत आहे. या मैत्रीतूनच माजी आमदार मुरकुटे यांना प्रहारची उमेदवारी मिळवून देण्यासाठी आमदार गडाख यांनी शिष्टाई केल्याचं बोललं जात आहे. आमदार गडाख यांच्या विनंतीला मान देऊन आमदार बच्चू कडू हे नेवासे तालुक्यात काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आयोजित करण्यात आलेल्या मोर्चातही सहभागी झाले होते.

राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो, हे दिग्गज राजकारणी मंडळींनी यापूर्वी वेळोवेळी बोलून दाखवलं आहे. राजकारणाचे डावपेच कधी आणि कुठे कसे टाकले जातात, हे सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडे असतं. सर्वसामान्यांची निवडणूक ही त्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर सुरु होते. मात्र दिग्गज राजकारणी मंडळींची निवडणूक दोन ते तीन वर्षे आधीच सुरु होते.

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि शंकरराव गडाख हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याच्या उघड चर्चाही नेवासे तालुक्यात यापूर्वी अनेकवेळा केल्या गेल्या आहेत. त्यामुळेच कदाचित माजी आमदार मुरकुटे यांनी गडाख सत्तेवर असताना त्यांना कधीच प्रखर विरोध केला नाही. या दोघांचं सहमतीचं राजकारण या तालुक्यात सुरु असल्याचा प्रत्यय यापूर्वी वेळोवेळी आला आहे.

दरम्यान, या निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी प्रहार पक्षाकडून भरलेला उमेदवारी अर्ज ते उद्या (दि. ४) मागे घेणार की ही निवडणूक लढविणार, या प्रश्नाचं उत्तर उद्या दुपारी तीननंतर समजणार आहे. तूर्तास या आणि अशा चर्चा यापुढे वरच्यावर ऐकायला मिळणार हे तितकंच खरं आहे. कारण अशा ‘चर्चा को खर्चा नहीं लगता’, या न्यायानं पुढच्या महिन्याभरात अशा चर्चांना चांगलंच उधाण येणार, हे मात्र निश्चित खरं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या