रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे’, अजरामर अशा शोले चित्रपटातलं हे गीत मैत्रीसाठी अतिशय मजबूत आणि ज्वलंत उदाहरण आहे. परंतु मैत्रीच्या या प्रामाणिक नात्याला कलंक लावणारा एक चतुर मित्र हल्ली अनेकांच्या डोक्यात बसला आहे. अतिशय जवळच्या आणि विश्वासू मित्रांना आर्थिकदृष्ट्या फसविणारा हा चतुर ‘संपत’लाल मात्र त्याच्या दुर्दैवानं आणि कुकर्मानं अल्पावधीतच संपण्याच्या मार्गावर आहे. ज्या ‘साहेबां’च्या भरवशावर हा ‘संपत’लाल आतापर्यंत असे उद्योग करत होता, त्याच ‘साहेबां’नी गेल्या दोन वर्षांपासून या ‘संपत’लालला झुरळासारखा झटकून टाकलाय. पण तरीही आजमितीला ‘याचा’ ‘ॲटिट्युड’ मात्र एखाद्या उद्योगपतीला लाजविणारा असाच आहे.
या ‘संपत’लालने सोनई शहरातल्या विविध ठिकाणच्या व्यापारी मित्रांना लाखो रुपयांना फसवलं असल्याची धक्कादायक बाब चर्चेद्वारे समोर येत आहे. यामध्ये मोठा कापड दुकानदार, सराफ व्यावसायिक, सेवानिवृत्त शिक्षक, शेतकरी, चष्मा विक्रेता आणि शनिशिंगणापूर देवस्थानचा एक विश्वस्त आदींसह अनेकांचा समावेश आहे. अनेक व्यापारी मित्रांकडून या ‘संपत’लालने दहा लाख, पाच लाख रुपये असे पैसे घेतले. ही रक्कम जवळपास तीन कोटींच्या आसपास आहे. पण ज्यावेळी ही मंडळी ‘संपत’लालकडे पैशांचा तगादा करायला लागली, त्यावेळी ‘संपत’लालने ‘तुम्ही माझ्याविरुद्ध कुठेही तक्रार करा. मी तुमचे पैसे देऊ शकत नाही’, असं म्हणत अक्षरशः हात वर केले.
आर्थिकदृष्ट्या फसले गेलेले हे सर्वजण ‘साहेबां’कडे गेले. ‘साहेबां’नी या सर्वांना आश्वासन दिलं, की ‘मी पाहतो’, ‘यामध्ये काही तरी करतो’. त्यामुळे ‘साहेबां’च्या शब्दाखातर ही मंडळी सध्या शांत असली तरी यापैकी अनेकजण आक्रमक झालेले आहेत. त्यामुळे कधीही ‘संपत’लालच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे.
फसल्या गेलेल्यांच्या सोबतीला आहे ‘रोखठोक 24 न्युज नेटवर्क’…!
आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हा ‘संपत’लाल कोण? त्याने कोणाकोणाला फसवलं आहे? आणि यामध्ये फसले गेलेले इतके हतबल का झाले आहेत? पोलीस ठाण्यात हे सर्वजण तक्रार का करत नाहीत? तर याचं उत्तर असं आहे, हे सर्वजण ‘साहेबा’ला घाबरताहेत. कारण या ‘संपत’लालने सर्वांना साहेबांची भीती घातली आहे. असं असलं तरी या आर्थिकदृष्ट्या फसल्या गेलेल्यांच्या सोबतीला रोखठोक 24 न्युज नेटवर्क सदैव आहे. त्यामुळे कोणाला काही मदत लागल्यास 70 28 35 17 47 या मोबाईल क्रमांकावर कधीही संपर्क साधावा.
… तर ‘साहेबां’चं होऊ शकतं ‘राजकीय’ नुकसान…!
या चतुर ‘संपत’लालला ‘साहेबां’नी झटकून टाकला असला तरी तो ‘साहेबां’च्या नावाचाच वापर अद्यापही करत आहे. आर्थिकदृष्ट्या फसली गेलेली ही सगळी मित्रमंडळी ‘साहेबां’च्याकडे पाहून शांत आहेत. मात्र यापैकी अनेक जण आक्रमक झाले असून ‘साहेबां’च्या पश्चात ते तक्रार करण्याच्या मानसिकतेत आहेत. असं झाल्यास ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला तर ‘साहेबां’चं मोठं राजकीय नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.