बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहमदनगर
अनुसूचित जाती व बौद्ध समाज घटकांचा विकास करणे या योजनेअंतर्गत नगर शहराजवळच्या वडारवाडी ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि ग्रामसेवक यांनी खोटे प्रस्ताव तयार करुन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ठेकेदाराशी संगनमत करत प्रचंड मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप या ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कैलास पगारे यांनी केला आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगर दौऱ्यावर आले असताना माजी उपसरपंच पगारे यांनी थेट त्यांनाच प्रश्न उपस्थित केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, वडारवाडी ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि ग्रामसेवकाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’चे गुन्हे कधी दाखल करताय, हा माजी उपसरपंच पगारे यांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे.
राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आज शिर्डीत आहेत. त्यांच्या या नगर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माजी उपसरपंच पगारे यांचा प्रश्न खूपच बोलका आहे. दरम्यान, माजी उपसरपंच पगारे यांनी या विषयासंदर्भात दि. 24 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती त्याचप्रमाणं सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना सविस्तर असं निवेदन दिलं होतं.
या निवेदनात पगारे यांनी म्हटलं आहे, की अनुसूचित जाती व बौद्ध समाज घटकांचा विकास करणे या योजनेअंतर्गत काम करत असताना शासनाच्या नियमानुसार निविदा प्रक्रिया न करता यामध्ये फार मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आलेला आहे. या घोटाळ्याप्रकरणी वडारवाडीचे ग्रामसेवक आणि प्रशासक यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसंच या आर्थिक घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी.