अहिल्यानगर'यांना' पाडायचं आणि 'यांना' निवडायचं...! सूज्ञ मतदारांनी केलाय निर्धार...!! जाणून घ्या, नक्की...

‘यांना’ पाडायचं आणि ‘यांना’ निवडायचं…! सूज्ञ मतदारांनी केलाय निर्धार…!! जाणून घ्या, नक्की कोण होणार आमदार आणि कोणाची होणार ‘खाट पलटी’…?

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

आगामी विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट व्हायला अवघ्या दोन दिवसांचा कालावधी उरला आहे. दिनांक 4 नोव्हेंबरनंतर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण राहणार आहेत, कोणाचे अर्ज बाद होणार आहेत, हे दोन दिवसांनी स्पष्ट होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध ठिकाणच्या मतदारसंघांत अनेकांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. काहींनी अपक्ष भरले आहेत तर काहींनी दोन दोन तीन तीन उमेदवारी अर्ज भरले आहेत. या सर्व उमेदवारी अर्जांपैकी कोणाचा अर्ज अवैध होणार, कोणाचा वैध ठरणार, हे दोन दिवसांनी समजणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत, त्यांची धाकधूक आता वाढू लागली आहे. आपला उमेदवारी अर्ज बाद होतो की मंजूर होतो, याकडे या सर्वांचं लक्ष लागलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांमध्ये एक प्रकारची स्पर्धा लागली असली तरी नक्की सत्तेसाठी या लोकांचा आटापिटा आहे की सत्यासाठी यांचा संघर्ष आहे, हे मात्र सर्वसामान्य मतदारांना चांगलंच कळून चुकलं आहे. म्हणूनच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सूज्ञ मतदारांनी एक मोठा निर्धार केला आहे.

सूज्ञ मतदारांच्या या निर्धारानंतर आणि निर्णयानंतर अनेकांना आमदारकीची लॉटरी लागणार आहे तर अनेकांची ‘खाट पलटी होणार’ आहे. कारण कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडायचं, याचा निर्णय घेण्याची संधी सूज्ञ मतदारांच्या हातात आहे. ज्यांचा उमेदवारी अर्ज मंजूर झाला, असे अनेक उमेदवार येणाऱ्या महिन्याभरात जोमाने प्रचार करुन मतदारांचं ‘ब्रेन वॉश’ करण्याचा प्रयत्न करतील. आमिषं, प्रलोभनं किंवा ‘गाजरं’ दाखवत विकासाच्या गप्पा मारल्या जातील.

मतदारांचा ‘चरणस्पर्श’ केला जाईल. समवयस्क मतदारांना आलिंगन दिलं जाईल. ‘काय अडचण आहे, काय पाहिजे, काही चुकलं का आमचं? मोकळेपणाने सांगा. मागं कधी तरी आमच्याकडून तुमचं मन दुखावलं गेलं असेल तर धाकटा भाऊ म्हणून माफ करा’, अशी विनंतीदेखील मतदारांना केली जाईल. परंतू सोशल मिडियाच्या जमान्यात नवमतदारांसह सर्वच मतदार आता चांगलेच सजग झाले आहेत. त्यामुळे मतदारांना कोणी कितीही ‘बनविण्याचा’ प्रयत्न केला, तरी त्यांचा तो प्रयत्न अपयशीच ठरणार आहे.

 

‘यांना’ पाडायचं आणि ‘यांना’ निवडायचं…!

फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच मतदारांसमोर जाणारे, मतदारांना गोड गोड बोलणारे, जेवणावळी आणि दारुच्या पार्ट्या देणारे, मतदानाची किंमत ठरवणारे, कोणत्या घरांत किती मत आहेत, याचा हिशोब लावून त्यानुसार पैशांचं वाटप करणारे, ‘तुमच्या घरातला एक जण नोकरीला लावू, तुमच्या भागातला रस्ता करु, पिण्याच्या पाण्याची सोय करु, खोल खड्डे असलेल्या तुमच्या भागातल्या रस्त्यावर मुरुम टाकू’, अशा प्रकारची आश्वासनं देणाऱ्या उमेदवाराची ‘खाट पलटी’ करण्याचा निर्धार सूज्ञ मतदारांनी केला आहे.

याउलट जो निवडणुकीव्यतिरिक्त लोकांच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी होत असतो, लोकांच्या एका हाकेवर धावून जातो, अर्ध्या रात्री त्याला कुणी फोन केला, अडचणीसाठी संपर्क केला तर अवघ्या काही मिनिटांत तो त्या ठिकाणी धाव घेतो. शासनाच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत कशा जातील, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, गोरगरीब जनतेला वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी जो सतत धावपळ करतो, एखाद्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्यास त्यासाठी रात्रभर पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसतो, कार्यकर्ते आणि मतदारांना आपल्या घरातलाच एक सदस्य मानतो, लबाड, ढोंगी आणि प्रस्थापित राजकारणी मंडळींच्या विरोधात जो सतत दंड थोपटून मैदानात उतरलेला असतो, अशा सर्वसामान्य चेहऱ्याच्या आणि भ्रष्टाचाराचा डाग नसलेल्या उमेदवाराला निवडून देण्याचा निर्धार सूज्ञ मतदारांनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या