बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहमदनगर
नगर शहराच्या जवळ असलेल्या वडारवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत दलित वस्ती सुधार योजनेच्या लाखो रुपयांच्या निधीची या ग्रामपंचायतीचा सदस्य असलेला ‘सर’ प्रशासकावर दबाव टाकत उधळपट्टी करत असल्याची चर्चा आहे. एखाद्या सदस्यानं विरोध केल्यास ‘हे ‘साहेबां’चं काम आहे, विरोध केला तर ‘साहेब’ तुझ्यावर नाराज होतील’, अशी भिती दाखवत हा ‘सर’ लोकप्रतिनिधीच्या नावाचा गैरवापर करत आहे. नायकूनगरमध्ये दलितांची घरं नसताना आणि त्या भागातला रस्ता सुस्थितीत असतानाही त्याच रस्त्यावर दलित सुधार योजनेतल्या लाखो रुपयांच्या निधीची उधळपट्टी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ‘सर’ असलेल्या या सदस्याला ठेकेदारी करता येत शक्य नसल्यामुळे त्याने एक ‘पोट ठेकेदार’देखील नेमला आहे. स्वतः रस्त्याची कामं घ्यायची आणि दुसऱ्या ठेकेदाराकडून मजूर संस्थेमार्फत ती करुन घ्यायची, असा सपाटा या ‘सर’ने लावला आहे. एकमेकांमध्ये भांडणं लावून स्वतःचा फायदा करुन घेण्यात हा ‘सर’ प्रचंड तरबेज आहे.
दरम्यान, नायकूनगरमध्ये चांगला रस्ता असताना आणि पुन्हा त्याच रस्त्याचं काम सुरु असताना संबंधित इंजिनियरनं कोणता चष्मा लावून या कामाचं ‘इस्टिमेट’ केल होतं? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.
चांगला रस्ता असताना त्याच रस्त्यावर पुन्हा दुसरा रस्ता करुन वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीतल्या नायकूनगर इथं दलित वस्ती निधीचा जो दुरुपयोग झाला, त्याकडे प्रशासकानंदेखील दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी आहेत. वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीत ज्या प्रभागात दलित वस्तीच नाही, त्या प्रभागात दलित वस्ती सुधार योजनेचा निधी खर्च करणाऱ्या ‘सर’ असलेल्या या ग्रामपंचायत सदस्याच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
… तर तो ‘सर’, प्रशासक, ग्रामविकास अधिकारी आणि बीडीओविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’नुसार गुन्हे दाखल करा…!
वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीतल्या नायकूनगरमध्ये दलितांचं फक्त एक घर असल्याचं बोललं जातंय. मात्र दुसऱ्या प्रभागातली दलित वस्ती आणि नायकूनगर ज्या प्रभागात आहे तो, असे दोन प्रभाग एकत्र करुन ‘बनवाबनवी’ करण्यात पटाईत असलेल्या ‘सर’ने प्रशासकाला हाताशी धरुन दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गतच्या निधीची उधळपट्टी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे वडारवाडी ग्रामपंचायतीचे प्रशासक, ग्रामविकास अधिकारी, तो ‘सर’ आणि बीडीओविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’नुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी दलित बांधवांच्यावतीनं केली जात आहे.