बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहमदनगर
रात्रीच्या वेळी आकाशात दिसणारे चार पाच ड्रोन कॅमेरे नक्की कोणाच्या मालकीचे आहेत? रात्रीच्या वेळी हे ड्रोन कॅमेरे आकाशात सोडण्यामागचा उद्देश नक्की काय आहे? यामागे कोणती यंत्रणा कार्यरत आहे? याचा बारकाईनं शोध घेण्याचं काम नगरची पोलीस यंत्रणा करत आहे. मात्र चोरीचा आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असा खुलासा नगर जिल्ह्याचे ॲडिशनल एस. पी. प्रशांत खैरे यांनी रोखठोक 24 न्युज नेटवर्कशी बोलताना केला.
काल (दि. २७) नऊच्या सुमारास नेवासे तालुक्यातल्या सोनई – कांगोणी रस्त्यालगतच्या शेटे पाटील वस्ती, जगताप वस्ती, मुळा कारखाना परिसर, खोसे वस्ती, कुसळकर वस्ती, मुथा फॉर्म, हनुमानवाडी, विठ्ठलवाडी, हिंगोणी, कांगोणी, खरवंडी, वडाळा बहिरोबा आदी भागांमध्ये आकाशात चार पाच ड्रोन कॅमेरे उडताना दिसले. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड घाबरट पसरली. या ड्रोनच्या अनुषंगानं अनेक प्रकारच्या अफवादेखील पसरवल्या गेल्या.
या संदर्भात नगर जिल्ह्याचे ॲडिशनल एस. पी. खैरे यांच्याशी आज (दि. २८) दुपारी १२ च्या सुमारास संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘हे ड्रोन लष्कराचे असल्याबाबत अफवा होती. मात्र ते खोटं आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही ड्रोन कंपन्यांचा सर्वे सुरु असल्याची खात्रीलायक माहिती पोलीस यंत्रणेला मिळाली नाही. मात्र त्यावर नगर पोलिसांचं ‘वर्कआउट’ सुरु आहे. लवकरच याचा उलगडा होईल, असा नगरच्या पोलिसांना विश्वास आहे’.
३ हजार ७५ लोकांनी वाचली ‘ही’ बातमी…!
जागते रहो, ड्रोन घेऊन चोरटे आले, अशी अफवा असलेली बातमी रोखठोक 24 न्युज नेटवर्कनं काल (दि. २७) रात्री व्हायरल केली होती. अर्थात यामागे अफवा पसरविण्याचा आमचा कुठलाही हेतू नव्हता. उलट अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कारवाई व्हावी, अशीच आमची अपेक्षा होती. सोनई पोलिसांनी या संदर्भात केलेला खुलासादेखील आम्ही या बातमीत घेतला होता. आतापर्यंत तब्बल ३ हजार ७५ लोकांनी ही बातमी वाचलीय.
ड्रोन संदर्भात अशा आहेत गंमतीशीर अफवा…!
पहिली अफवा :
बदलत्या तंत्रज्ञानानुसार चोरट्यांनीदेखील नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं आहे. एखाद्या ठिकाणी चोरी करुन लंपास केलेला सोने, चांदी, रोख रक्कम असा मौल्यवान ऐवज ड्रोनच्या साह्याने चोरटे पळून नेतात. हे ड्रोन इतके प्रभावी असतात, की एखाद्याने सोनं, पैसा अडका जिथं कुठे ठेवला असेल तिथून हे सारं या ड्रोनला चिकटतं.
दुसरी अफवा :
सोनई – कांगोणी रस्त्यालगतच्या एका वस्तीवर असलेल्या बदामाच्या झाडाला ड्रोन धडकलं, खाली पडलं आणि पुन्हा उठलं. या ड्रोनच्या सहाय्यानं काही ठिकाणी चोऱ्या झाल्याच्याही गंमतीशीर अफवा ऐकायला मिळाल्या.
तिसरी अफवा :
घोडेगावातल्या एका रस्त्यावरुन दोन-तीन दिवसांपूर्वी मध्यरात्री शुकशुकाट असताना कान टोपी घातलेले आठ ते दहा तरुण हातात लाकडी दांडके, तलवारी आदी घेऊन चालले होते. तो फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्याचं बोललं जात आहे.
चौथी अफवा :
चोरटे चोरी करायला आल्यानंतर प्रत्येकाच्या मोबाईलला ‘जामर’ लावतात. त्यामुळे मोबाईलचे नेटवर्क बंद पडतं. कोणीच पोलिसांना संपर्क साधू शकत नाही. एखाद्याकडे सोनं, चांदी किंवा पैसा आढळून आला नाही तर चोरटे माणसांना जागच्या जागीच ठार मारुन टाकतात.
अर्थात या अफवा जरी असल्या तरी त्या खऱ्या वाटायला लागतात आणि ज्या व्यक्तीला बीपी, शुगर आहे किंवा एखादा हार्ट पेशंट आहे, त्याच्या हृदयाचे ठोके आपोआप वाढू लागतात. मात्र या अफवा ऐकून शहाण्या माणसाला हसावं की रडावं, हेच कळेनासं झालं आहे.
पोलीस यंत्रणा झालीय हतबल…!
नगर जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन फिरताना दिसून आले आहेत. दोन-तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरु आहे. मात्र हे ड्रोन नक्की कोणाचे, या पाठीमागे नक्की काय उद्देश आहे, वस्तुस्थिती नेमकं काय आहे, याचा उलगडा करण्यात नगरची पोलीस यंत्रणा अद्याप तरी यश मिळवू शकली नाही. फक्त ड्रोन आणि चोरीचा काहीही संबंध नाही, या पलीकडे पोलीस काहीही सांगत नाहीत. ड्रोनचा खुलासा करण्यात नगरची पोलीस यंत्रणा एकप्रकारे हतबल झाल्याचं सध्या तरी दिसत आहे.
अफवा पसरविण्यात मोठी माणसंही सामील…!
कुठल्याही वाईट घटनेसंदर्भात एखाद्या वेडसर माणसान अफवा पसरवली तर त्यावर फारसा कोणी विश्वास ठेवत नाही. मात्र आकाशात फिरणाऱ्या ड्रोनसंदर्भात अफवा पसरविणाऱ्यांमध्ये ज्यांनी घाबरणाऱ्यांना धीर द्यायचा असतो, दिलासा द्यायचा असतो, घाबरणाऱ्यांचं मनोधैर्य वाढवायचं असतं, तीच मोठी आणि शहाणी माणसंसुद्धा सामील असतात, हीच मोठी शोकांतिका आहे.