रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
गेल्या तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या रेखा जरे हत्याकांडातले सरकारी साक्षीदार डॉ. विजय मकासरे यांना बुलेटवरुन आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी जीवे मारण्याची धमकी दिली.
आज (दि. ६) दुपारी रेखा जरे हत्याकांडातले सरकारी साक्षीदार डॉ. मकासरे हे महत्त्वाच्या कामानिमित्त नगरकडे जात होते. अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाजवळून शेंडी बायपासमार्गे एमआयडीसीकडे जात होते. तेवढ्यात विनानंबरच्या बुलेटवरुन आलेल्या दोघा हेल्मेटधारी अज्ञात इसमांनी डॉ. मकासरे यांची कार अडवली.
डॉ. मकासरे यांना त्या दोघांपैकी एक जण म्हणाला, ‘तु रेखा जरे हत्याकांडात सरकारी साक्षीदार आहे ना? आमच्या बाजूने साक्ष दे. आमच्या विरोधात साक्ष दिल्यास तुला ट्रकनं उडवून देऊ’, अशी धमकी देत ते अज्ञात इसम तिथून निघून गेले. डॉ. मकासरे यांनी घडलेल्या प्रकारासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.