रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांसाठी ४० टक्के तर महिला ज्येष्ठ नागरिकांसाठी ५० टक्के सवलत देण्यात येत होती. कोरोना काळापासून ही सवलत बंद करण्यात आली आहे. राधामोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय स्थायी समितीच्या अहवालात ज्येष्ठ नागरिकांसाठी सुट देण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र हा निर्णय अद्यापही प्रलंबित असून त्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावी, अशी मागणी खा. लंके यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केलीय.
अहमदनगर जिल्हा हा पुणे (Pune) व संभाजीनगर या महत्वाच्या जिल्ह्यांना जोडणारा जिल्हा आहे. या तिन्ही जिल्ह्यांमधील औद्योगिकरण तसेच धार्मिक स्थळांचा विचार करता सुपा-नगर मार्गे पुणे ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्ग सुरू करा, अशी मागणीही खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्याकडे केली.
या रेल्वे मार्गाचा फायदा पुणे- नगर -संभाजीनगर येथील औद्योगिक वसाहतींना होणार आहे. दरम्यान, शिरूर ते संभाजीनगर हा रस्ताही सहा पदरी करण्याची मागणी लंके यांनी नुकतीच मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे केली
संभाजीनगर – नगर – पुणे हा रेल्वेमार्ग अनेक अर्थाने महत्वाचा आहे. या मार्गावर श्री क्षेत्र देवगड देवस्थान, शनिशिंगणापूर, शिर्डी, रांजणगाव गणपती अशी महत्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. येथे अनेक पर्यटक व भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात. हा मार्ग संभाजीनगर व पुणे विमानतळांना जोडत असल्याने वाहतूकही सोईस्कर होणार आहे. तसेच या मार्गावर वाळुंज, संभाजीनगर, सुपा, शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर, पुणे अशी औद्योगिक क्षेत्रे आहेत.
या रेल्वेमार्गामुळे औद्योगिक भरभराट होऊन व पर्यटनालाही चालना मिळणार आहे. या रेल्वेमार्गामुळे शहरी वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होणार असल्याचे त्यांनी रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासोबतच नितीन गडकरी यांच्याकडे शिरूर ते औरंगाबाद सहापदरी रस्त्याची मागणी केली.
बेलापूर रेल्वे स्थानकावरील बंद करण्यात आलेली साई फास्ट पॅसेंजर पुन्हा सुरू करावी तसेच वाराणसी एक्सप्रेस, साईनगर शिर्डी एक्सप्रेस या गाडयांनाही या स्थानकावर थांबा देण्याची मागणी केली. गव्हाणवाडी ते बेल्हा या रस्त्याची सध्या टेंडर प्रक्रिया सुरू असून हा बागायत पट्टा असल्याने डांबरीकरणाऐवजी काँक्रिटचा रस्ता करावा, अशी मागणी करण्यात आल्याचंही खासदार लंके म्हणाले.
नगर ते कल्याण या रेल्वेमार्गाचीही खासदार लंके यांनी रेल्वे मंत्र्यांकडे मागणी केली. शेतकऱ्यांसाठी हा मार्ग महत्वाचा असून शेतमालाची वाहतूक कल्याण, मुंबई सारख्या शहरांपर्यंत या मार्गाने सुलभ होऊ शकेल. या ठिकाणी मोठया संख्येने उद्योजक, व्यापारी, नोकरदार प्रवास करत असून या मार्गही सुरू करण्याची मागणी खासदार लंके यांनी केली.
नगर शहराचा बायपास अरणगावमधून गेलेला आहे. त्यामुळे या गावाला जोडणारे रस्ते बंद झाले आहेत. या परिसरातील नागरिकांच्या सोईसाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूस उपरस्ते करावेत तसेच जामखेड भागात ज्या रस्त्यांची कामे बंद अवस्थेत आहेत. त्यांची कामे सुरू करावीत, अशी मागणीही नितीन गडकरी यांच्याकडे केल्याचे खासदार लंके म्हणाले.