भिंगार पोलीस ठाण्यात नेमणुकीला असलेल्या हवालदार प्रवीण जगताप या पोलीस कर्मचाऱ्यानं मागच्या आठवड्यात विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हवालदार जगताप यांच्यावर नगर शहरातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हवालदार जगताप यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. हवालदार जगताप यांनी पोलीस ठाण्यातच विषारी औषध घेतलं असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या चर्चेला भिंगार कॅप पोलीस ठाण्याच्या परिसरातच दुजोरा मिळत आहे.
हवालदार जगताप यांच्यावर नक्की कुणाचं दडपण होतं? त्यांना कोण मानसिक त्रास देत होतं? ते व्यसनाधीन होते का? ते कर्जबाजारी झाले होती का? त्यांना काही गंभीर स्वरुपाचा मानसिक तणाव होता का? हवालदार जगताप यांनी का आणि कोणतं औषध घेतलं? हवालदार जगताप यांना आत्महत्या करण्यास कोणी प्रवृत्त केलं होतं? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत.
या संदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता याविषयी कुठलीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं. मात्र संबंधित खाजगी रुग्णालयात चौकशी केली असता हवालदार जगताप यांना उपचारार्थ डीएसपी चौकातल्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलंय.