बांधकाम व्यावसायिकाला ८ लाख रुपयांची लाच मागितल्याचा ज्यांच्यावर आरोप करण्यात आलाय, ते नगर महापालिका आयुक्त तथा प्रशासक पंकज जावळे आणि त्यांचा पीए शेखर देशपांडे हे दोघे तब्बल दीड महिन्यापासून फरार आहेत. या दोघांना नक्की कोणी आश्रय दिला? हे दोघे नक्की कुठं लपले आहेत? या दोघांचा शोध घ्यायला अँटी करप्शन ब्युरोच्या नगर विभागाला अद्यापपर्यंत यश का आलेलं नाही? या दोघांना कोणाचा वरदहस्त आहे? हे आणि असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत.
एखादी व्यक्ती किंवा आरोपी सापडत नसेल तर हिंदी चित्रपटातला एक गाजलेला डायलॉग आहे. ‘उसे आसमां खा गया या जमीं निगल गई’? असाच काहीसा प्रश्न संतप्त नगरकरांच्या मनामध्ये सध्या घर करून आहे. लाचखोरीचा आरोप असलेले आयुक्त जावळे आणि पीए शेखर देशपांडे हे दोघे दीड महिन्यापासून नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सापडत नाहीत. यापेक्षा या विभागाचं दुसरं मोठं अपयश कोणतं असू शकतं?
या संदर्भात आम्ही नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात चौकशी केली असता ‘आमचे प्रयत्न सुरू आहेत. या दोघांविषयी कोणाला काही माहिती मिळाली तर आम्हाला संपर्क करा’, अशा प्रकारची हतबलता या विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं खासगीत बोलताना व्यक्त केली.
विश्वास नांगरे पाटील या विभागाची मरगळ दूर करतील का?
25 ते 30 वर्षांपूर्वी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा प्रचंड दरारा होता. एखाद्या भ्रष्ट अधिकारी किंवा कर्मचाऱ्याविषयी या विभागाला नुसती माहिती जरी मिळाली तरी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी संबंधितांविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीनुसार या विभागाकडून ‘ट्रॅप’ लावला जायचा. संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यानं यशस्वी ‘ट्रॅप’नंतर कितीही पळण्याचा प्रयत्न केला, तरी या विभागाचं पथक येनकेन प्रकारेन संबंधितांच्या मुसक्या आवळण्याचं काम करायचं. मात्र अलीकडच्या काळात या विभागातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अशी मरगळ आली आहे. एक अर्थानं या विभागाकडे नागरिक आता संशयानं पाहू लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर नगरच्या लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आलेली ही मरगळ दूर करण्यासाठी या विभागाचे वरिष्ठ अधिकारी असलेले विश्वास नांगरे हे यासाठी पुढाकार घेतील का, ही मरगळ ते दूर करतील का, हाच खरा प्रश्न आहे.