अहमदनगर जवळच्या वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीत ज्या ठिकाणी दलित वस्तीच नाही, त्या ठिकाणी दलित वस्ती विकास निधीच्या लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. प्रशासकीय कार्यकाळात हा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप या ग्रामपंचायतीचे माजी सदस्य कैलास पगारे यांनी केला आहे.
यासंदर्भात पगारे यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागासह समाज कल्याण विभागाला पत्र दिलं आहे. यासंदर्भात पगारे यांनी सांगितलं, की वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीत जिथे अजिबात दलित वस्ती नाही, अशा अनेक ठिकाणी 70 लाख रुपये खर्चाची कामे करण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे ज्या भागात रस्ते चांगले असतानादेखील तिथं रस्ते करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत सदस्यांना विशेषतः माझ्यासारख्या दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला प्रशासक अजिबात विश्वासात घेत नाहीत, अशी परिस्थिती आहे.
वडारवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि प्रशासक यांच्या संगणमतानं दलित वस्ती विकास निधीतून 70 लाख रुपये खर्च करून पाईपलाईन दुरुस्ती, नाली दुरुस्ती जेसीबीने कचरा उचलणं अशा कामांची गैरमार्गानं बिलं काढण्यात आली आहेत. दरम्यान, पगारे यांच्या या पत्राची दखल घेत समाज कल्याण विभागाने गटविकास अधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.