बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहमदनगर
नगर शहराजवळ असलेल्या मौजे वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांचा विकास करण्याच्या प्रशासकीय मान्यतेची चौकशी करण्याची मागणी या ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कैलास पगारे यांनी दि. 29. 8. 2024 रोजी नगरपंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) आणि जिल्हा परिषदेकडे एका पत्राद्वारे केली होती. दरम्यान, या पत्राची चौकशी करुन तसा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठवावा, अशा आदेशाचे पत्र दि. 3. 9. 2024 रोजी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (डेप्युटी सीईओ) दादाभाऊ गुंजाळ यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलं होतं.
या ग्रामपंचायतीचे उपसरपंच पगारे यांनी जी तक्रार केली आहे, त्या तक्रारीचा अहवाल पाठविण्याचे आदेश झेडपी डेप्युटी सीईओ गुंजाळ यांनी दिले होते. मात्र या पत्राला बीडीओकडून केराची टोपली दाखविण्यात आल्याचा आरोप माजी उपसरपंच पगारे यांनी केला आहे. यासंदर्भात वडारवाडी ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि ग्राम विकास अधिकारी यांना जिल्हा परिषदेचा आदेश लागू होत नाही का, असा सवालही पगारे यांनी उपस्थित केला आहे.
वडारवाडी ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि ग्राम विस्तार अधिकारी यांना स्थानिक ग्रामस्थांचं काहीही घेणं देणं राहिलेलं नाही. त्यांना फक्त पोटभरायची आणि टक्केवारी घ्यायची चिंता लागून राहिली आहे, असा गंभीर आरोप माजी उपसरपंच पगारे यांनी केला आहे. वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीत दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीचा गैरवापर होत असून या कामाची सखोल चौकशी झाल्याशिवाय ठेकेदाराला बिलं अदा करण्यात येऊ नयेत, अशी मागणी देखील पगार यांनी केली आहे.
वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीत मूलभूत सुविधांचा अभाव असून टक्केवारी मिळवून स्वतःचीच पोटं भरायची कामं सुरु आहेत. वरिष्ठ पातळीवरही ‘कमिशन’ पोचवलं जात असावं. म्हणूनच जिल्हा परिषदेचे अधिकारी हे पंचायत समिती तसंच वडारवाडी ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि ग्रामविस्तार अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराकडे डोळे झाक करत असून यावर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही, असंही माजी उपसरपंच पगारे यांनी म्हटलं आहे.
‘डोमकावळे’ मास्तरची व्यर्थ लुडबूड ठरतेय स्थानिक ग्रामस्थांची डोकेदुखी…!
वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीत विकासकामं करत आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याऐवजी ‘पिंडाला चटावलेल्या कावळ्याप्रमाणे वडारवाडी ग्रामपंचायतीचा एक ‘डोमकावळे’ मास्तर अशी ओळख असलेला हा पदाधिकारी कुठं काही भेटतं का, यासाठी नेहमीच टपून बसलेला असतो. या डोमकावळे मास्तरची व्यर्थ लूडबूड वडारवाडी ग्रामस्थांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरत आहे.