अहिल्यानगरवाळकीचा पशुवैद्यकीय दवाखाना 'रामभरोसे' ; डॉक्टर करताहेत नगरमध्ये 'प्रॅक्टिस'...!

वाळकीचा पशुवैद्यकीय दवाखाना ‘रामभरोसे’ ; डॉक्टर करताहेत नगरमध्ये ‘प्रॅक्टिस’…!

Published on

spot_img

शेतकऱ्यांच्या पशुधनाची सेवा करण्याची जबाबदारी सरकारी पातळीवर ज्या डॉक्टरवर सोपविण्यात आलेली आहे, त्या डॉक्टरचं नगर तालुक्यातल्या वाळकी इथं असलेल्या पशुवैद्यकीय केंद्राकडे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे वाळकीचा हा पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या अनेक महिन्यांपासून ‘रामभरोसे’च आहे.

पशुधनाच्या आरोग्यासाठी शेतकऱ्यांना खासगी डॉक्टरांना नाविलाजास्तव हजारो रुपये द्यावे लागत आहेत. या पशुवैद्यकीय केंद्रावर ज्यांची नेमणूक झाली आहे, ते डॉक्टर मात्र नगरमध्ये बिनधास्तपणे ‘प्रॅक्टिस’ करत आहेत. या गंभीर प्रकाराची नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ दखल घेतील का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे.

शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादन हा चांगला पर्याय आहे. मात्र दुभत्या जनावरांची काळजी घेण्यासाठी सरकारनं नेमलेल्या सरकारी डॉक्टरचं जबाबदारीकडे पूर्णतः दुर्लक्ष झालं आहे. नगर तालुक्यातलं वाळकी हे गाव जनावरांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे साहजिकच या गावातल्या शेकडो नव्हे तर हजारो शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पशुधन आहे.

एखाद्या गंभीर आजारात मात्र हे पशुधन प्रचंड धोक्यात येतं. अशावेळी डॉक्टरची नितांत आवश्यकता असते.
मात्र वाळकी गावातल्या शेतकऱ्यांना खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवरच अवलंबून रहावं लागत आहे. दुसरीकडे ज्या डॉक्टरवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्या डॉक्टरची ‘प्रॅक्टिस’ मात्र नगरमध्ये जोरात सुरु आहे. लाखो रुपयांची माया ते या ‘प्रॅक्टिस’मधून गोळा करत आहेत. पाळीव श्वानांच्या मलमपट्टीसाठी हे डॉक्टर संबंधितांकडून मोठी रक्कम उकळत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचं पशुधन वाऱ्यावर सोडणाऱ्या या डॉक्टरविरुद्ध कारवाई व्हावी, अशी अपेक्षा वाळकीच्या तमाम शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.

… तर या डॉक्टर विरुद्ध तीव्र आंदोलन करू…!

राज्य शासनाकडून पगारापोटी लाखो रुपये उकळणाऱ्या या डॉक्टरला शेतकऱ्यांच्या पशुधनाची अजिबात काळजी नाही. या डॉक्टरला स्वतःच्या प्रॅक्टिसची चिंता लागली आहे. एखाद्या गंभीर प्रसंगी खासगी डॉक्टरांना शेतकऱ्यांना खूप पैसे मोजावे लागताहेत. या डॉक्टरला वेळीच जबाबदारीचं भान आलं नाही तर लवकरच या डॉक्टरविरुद्ध तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल.

विठ्ठल भालसिंग, प्रगतशील शेतकरी, वाळकी, तालूका नगर.

आणखी महत्वाच्या बातम्या