अहिल्यानगरविधानसभा निवडणुकीचा रागरंग...! नगर शहर शिवसेनेतल्या (ठाकरे गट) इच्छुकांमध्ये...

विधानसभा निवडणुकीचा रागरंग…! नगर शहर शिवसेनेतल्या (ठाकरे गट) इच्छुकांमध्ये उमेदवारीवरुनच मतभिन्नता…! … तर मग महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग मोकळा…!

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील / अहमदनगर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सर्वत्र वेगवेगळ्या चर्चा, तर्क, अंदाज व्यक्त केले जात आहेत. या निवडणुकीत उमेदवारी करण्यासाठी अनेकांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. खरं तर या सर्वांनाच उमेदवारी मिळणं अशक्य आहे. मात्र प्रत्येकालाच राजकीय महत्त्वाकांक्षा असल्यानं इच्छुकांच्या या ‘भाऊगर्दी’चं काय करायचं, ही पक्षश्रेष्ठींसाठी मोठी डोकेदुखी ठरते आहे.

दरम्यान, या निवडणुकीत नगर शहर मतदारसंघाचा विचार करायचा झाल्यास शहर शिवसेनेतल्या (ठाकरे गट) इच्छुकांमध्ये उमेदवारीवरुनच मतभिन्नता पहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा किंबहुना महाविकास आघाडीचा एकमेव असा प्रबळ दावेदार कोण, हेच ठरत नसल्यानं काहीशी संभ्रमावस्था पहायला मिळतेय. याचा परिणाम असा होण्याची शक्यता आहे, की महायुतीच्या अर्थात शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पार्टीचा जो कोणी संभाव्य उमेदवार या निवडणुकीत उभा केला जाईल, त्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याची चिन्हे आजमितीला पहायला मिळताहेत.

नगर शहर मतदारसंघावर गेली २५ वर्षे माजी मंत्री दिवंगत अनिल भैय्या राठोड यांची सत्ता होती. त्याकाळच्या विधानसभा निवडणुकीत काहींचा अपवाद वगळता एकास एक उमेदवार असंच राजकीय चित्र पहायला मिळत होतं. सध्या मात्र वेगवेगळ्या राजकीय पक्षातला प्रत्येक जण स्वतःला भावी आमदार समजू लागला आहे. इच्छुकांच्या या भाऊगर्दीमुळे बंडखोरांची संख्या वाढण्याची शक्यता असून हे सर्वच बंडखोर एकमेकांची मतं खाऊन प्रतिस्पर्धी म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला विजयाच्या वाटेवर नेऊन ठेवतील, अशी सद्यस्थिती पहायला मिळत आहे. दरम्यान,
वरिष्ठ पातळीवर नगर शहराच्या जागेसंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात एकमत होत नसल्यानं ही जागा मित्र पक्षाला सोडण्याची तयारी असल्याचं समजतं परंतु मित्र पक्षाकडेही बलाढ्य उमेदवार नसल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा विजय होण्याचा मार्ग सुकर होईल, असं आजच्या परिस्थितीवरुन तरी वाटतंय.

दुसरीकडे महायुती म्हणजे शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पक्षात अशी परिस्थिती दिसत नाही. कारण महायुतीत जरी इच्छूक असले तरी त्या इच्छुकांची संख्या मर्यादित आहे. विशेष म्हणजे या इच्छुकांना माघार घ्यायला भाग पाडणारे दिग्गज नेते मंडळी असल्यानं आणि ‘इलेक्टेड मेरिट’ पाहूनच महायुतीचा उमेदवार उभा केला जाणार आहे. त्यामुळे या एकाच उमेदवाराच्या विजयासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न केले जाणार आहेत. एकंदरित, आगामी विधानसभा निवडणुकीत एकास एक उमेदवार नसल्यानं महायुतीच्या उमेदवाराला यश मिळण्याची दाट शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या