रोखठोक 24 न्यूज नेटवर्क / अहमदनगर
लाडक्या गणरायाचं विसर्जन काल (दि. १७) वेगवेगळ्या पद्धतीनं करण्यात आलं. नगर शहरात डीजेच्या तालावर तर पाथर्डी तालुक्यातल्या मोहोज बुद्रूक या ग्रामीण भागात टाळ मृदुंगाच्या गजरासह हरीनामाच्या जयघोषात गणरायाचं विसर्जन करण्यात आलं.
पाथर्डी तालुक्यातल्या मोहोज बुद्रुक या गावच्या ग्रामस्थांचं हे अढळ असं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी तन-मन-धनानं या गणेश मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून श्री गणेशाची पूजा अर्चा सुरु ठेवली आहे. हा गणपती नवसाला पावतो, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. त्यामुळे पावन गणपती असं पाथर्डी तालुक्यातल्या मोहोज बुद्रुक या गावातल्या गणपती मंदिराचं नाव आहे.
सालाबाद प्रमाणं स्थानिक ग्रामस्थांसह पावन गणपती मित्र मंडळाच्यावतीनं श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दहा दिवस सकाळ संध्याकाळ आरती करण्यात आली आणि काल (दि. १७) भक्तीभावानं श्रीगणेशाला निरोप देण्यात आला.
यानिमित्तानं टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात स्थानिक ग्रामस्थ आणि पावन गणपती मित्र मंडळाच्यावतीनं भव्य दिव्य अशी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी श्रीफळ देऊन गणेशभक्तांचा सत्कार करण्यात आला. शहरातल्या डीजेच्या तालावर निघालेल्या विसर्जन मिरवणुकीपेक्षा ग्रामीण भागातली टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेली ही मिरवणूक सर्वांना आकर्षित करणारी ठरली.