प्राथमिक शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा वाढवला जात आहे. राज्य सरकार रोजच वेगवेगळे उपक्रम शिक्षकांवर लादत आहे. प्रत्येक उपक्रम राबवताना कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मूळ शैक्षणिक कार्यावर परिणाम झाला आहे. शाळा (School) किंवा इतर उपक्रमांची माहिती देताना छायाचित्र, माहिती लिंकवार पाठवणे, व्हॉट्सअप माहितीचे छायाचित्र, लिंक पाठवणे, सरकारकडून येत असलेल्या सर्वेक्षणाच्या विविध कामांसह अशैक्षणिक कामांचा बोजा वाढवला जात आहे.
5 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणाऱ्या शिक्षकदिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार आणि दुसऱ्या दिवशी अर्थात 6 सप्टेंबरला जिल्हा परिषदेवर मोर्चा नेण्यात येणार आहे. यासाठी 15 शिक्षक संघटना नगर जिल्हा परिषदेचे सीईओ आशीशिष येरेकर यांच्या विरोधात एकवटल्या आहेत.
या संघटनाच्या शिक्षकांनी सर्व सरकारी ‘व्हॉट्सअप ग्रुप’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक संघटना समन्वय समितीने ‘आम्हाला शिकवू द्या’ या मोर्चाचे आयोजन केलं आहे.
सर्व अशैक्षणिक कामाचा ताण कमी करण्याच्या मागणीसाठी मोर्चा असणार आहे, अशी माहिती समन्वय समितीचे रावसाहेब रोहोकले, आबासाहेब जगताप, बापूसाहेब तांबे, सुनील बनोते, कल्याण लवांडे, राजेंद्र निमसे, राजेंद्र ठोकळ, डॉ. संजय कळमकर दिलीय.