अहिल्यानगरशिर्डी विमानतळाला जप्तीची नोटीस ; थकीत कराची बाकी न भरल्यामुळे काकडी ग्रामपंचायतीनं...

शिर्डी विमानतळाला जप्तीची नोटीस ; थकीत कराची बाकी न भरल्यामुळे काकडी ग्रामपंचायतीनं पाठवलं मालमत्ता जप्तीचं वॉरंट…!

Published on

spot_img

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी येथे भारतासह इतर देशातले भाविकदेखील येतात. मागील काही वर्षांत येथे विमानतळ उभारण्यात आले आहे. याच शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे असलेली थकीत कराची बाकी न भरल्यानं जंगम मालमत्ता जप्तीचं वॉरंट काकडी ग्रामपंचायतीनं विमानतळ प्रशासनाला दिलं आहे.

कोपरगाव तालुक्यातल्या काकडी इथं असलेल्या शिर्डी विमानतळाकडे काकडी ग्रामपंचायतीची कराची रक्कम सातत्याने पाठपुरावा करुनही मिळत नसल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १२९ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीनं महाराष्ट्र विमान विकास प्राधिकरण कंपनी, मुंबई यांना पाठविलेल्या पत्रात म्हटलं आहे, कर बाकी भरण्याबाबत सातत्यानं दिलेली पत्रे, फेब्रुवारी २०२३ मध्ये दिलेले अंतिम स्मरणपत्र, २४ मार्च २०२४ रोजी हुकूम नोटीस, १२९ प्रमाणे दिलेली करवसुली नोटीस, राष्ट्रीय लोकअदालत नोटीस, ग्रामपंचायतीचा मासिक सभा ठराव देऊनही कर भरणा केलेला नाही.

त्यामुळे शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे असलेली थकीत कराची वसुली करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १२४ व कलम १२९ अन्वये खालील नमूद मिळकतीप्रमाणे मागणी बिले, नोटीस, रिट हुकूम, लोकअदालत नोटीस बजावलेल्या आहेत, सदर थकबाकी वसुली करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १२९ नुसार खालील प्रमाणे जंगम मालमत्ता असून सदरील जंगम मालमत्ता कराची थकबाकी न भरल्यामुळे मालमत्तांचे येणे आहे.

८ कोटी ३० लाख रुपये कराची रक्कम ग्रामपंचायत कार्यालयास जमा होत नसल्याने गावच्या सर्वांगीण विकासावर व दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे सदर थकबाकी वसुलीकरिता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२९ अन्वये जंगम मालमत्ता जप्ती वॉरंट बजावण्यात येत असल्याचे जप्ती वॉरंटमध्ये म्हटले आहे.

ही मालमत्ता होणार जप्त…!

करपात्र जंगम मालमत्ता आरसीसी पद्धतीचं घर, टर्मिनल बिल्डिंग पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर टर्मिनल बिल्डिंग (पोर्च), आरसीसी पद्धतीचे घर, पेव्हर ब्लॅक एरिया पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर, इंडियन आईल पंप पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर सबस्टेशन बिल्डिंग पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर, पॉवर (जेनरेटर बिल्डिंग) पहिला मजला, मनोरा तळ घर, एटीसी टाबर पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर, रनवे पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर जीएसआर वॉटर टैंक पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर, वॉल कंपाउंड पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर पार्किंग रस्ता नं. १ पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर, पार्किंग रस्ता नं. २ पहिला मजला, पडसर खुली जागा ८२३.५० एकर जागांवर ग्रामपंचायतीनं २०१६-१७ पासून कर आकारणी केलेली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या