नेवासे तालुक्यातल्या घोडेगाव येथे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या महिलेच्या सुनेचा राहुरी तालुक्यातल्या वळण येथे राहणारा सावत्र भाऊ देवानंद भालचंद्र मकासरे याने अपहरण केलं असल्याचा आरोप एका महिलेनं केला आहे. याप्रकरणी अपहरणाची तक्रार देऊनही सोनई पोलिसांनी मिसिंगचा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास 15 ऑगस्ट रोजी सदर महिला सोनई पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करणार आहे. या संदर्भात लताबाई चिमाजी ठोंबरे या महिलेनं नगरचे एसपी राकेश ओला यांना निवेदन दिलं आहे.
या निवेदनात म्हटलं आहे, की सदर महिलेची सून संजीवनी किशोर ठोंबरे हिला तिचा भाऊ देवानंद मकासरे हा त्याच्या दुचाकीवर बसवून घेऊन गेला. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मी गेले असता पोलिसांनी सून हरवण्याची तक्रार नोंदवून घेत गुन्हा दाखल केला. मकासरे हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यामध्ये गावठी कट्टा बाळगणं, वाळू तस्करीसह बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. मकासरेपासून माझ्या कुटुंबाच्या जिविताला धोका निर्माण झाला असून त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा 15 ऑगस्ट रोजी सोनई पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.