सासरी नांदत असलेली सून सावत्र भावानं पळवून नेली, त्याचा पोलिसांनी शोध घ्यावा या मागणीसाठी ऐन स्वातंत्र्यदिनी नेवासा तालुक्यातल्या घोडेगावच्या लताबाई चिमाजी ठोंबरे या महिलेनं (सासू) सोनई पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरु केलं आहे.
यासंदर्भात उपोषणकर्त्या लताबाई चिमाजी ठोंबरे यांनी सांगितलं, की त्यांची सून संजीवनी किशोर ठोंबरे हिला राहुरी तालुक्यातल्या वळण इथला तिचा सावत्र भाऊ देवानंद मकासरे हा त्याच्या दुचाकीवर बसवून घेऊन गेला आहे.
याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मी गेले असता पोलिसांनी सून हरवल्याची तक्रार नोंदवून घेत गुन्हा दाखल केला. मकासरे हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यामध्ये गावठी कट्टा बाळगणं, वाळू तस्करीसह बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत.
मकासरेपासून माझ्या कुटुंबाच्या जिविताला धोका निर्माण झाला असून त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. दरम्यान, या घटनेला पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या काळात सोनईच्या पोलिसांनी नक्की काय तपास केला, असा प्रश्न उपस्थित केला जात असून आरोपी मकासरेला पाठीशी घालणारा तपास अधिकारी असलेला तो पोलीस कर्मचारी नक्की कोण, अशी विचारणा केली जात आहे.