बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
221 स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघात सध्या जे काही सुरु आहे, त्याकडे निवडणूक आयोगाच्या कोणाचंच लक्ष का नाही? निवडणूक आयोगाचे जे कोणी प्रतिनिधी असतील, त्यांच्या डोळ्याला भात बांधला आहे का? या मतदारसंघातल्या सोनई ग्रामपंचायत हद्दीत शेकडो मृत शेळ्यांची मुंडकी आढळली असताना निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी नक्की काय करताहेत? असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत. सुसंस्कृतपणाचा टेंभा मिरविणाऱ्या प्रस्थापितांकडून मतदारांना चक्क शेळ्यांच्या मटणाचा रतीब लावण्यात आला आहे. यातल्या काही मृत शेळ्यांची मुंडकी सोनई ग्रामपंचायत कार्यालयासमोर टाकून जागरुक ग्रामस्थांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी (दि. ५) जिथं चिमुकल्यांवर ज्ञानदानातून संस्कार केले जात आहेत, त्या शैक्षणिक संस्थेच्या आवारात शेकडो मतदारांना कोंबड्याच्या मटणाची मेजवानी आयोजित करण्यात आली होती. तर शाकाहारी असलेल्या मतदारांसाठी पनीरची भाजी आणि चपात्या वाढण्यात आल्या होत्या. पाचशे रुपये रोजंदारीप्रमाणे 50 मुलं मतदारांना जेवण वाढण्यासाठी तैनात करण्यात आली होती. ही सर्व व्यवस्था कोणी केली होती? हा प्रकार मतदारांवर प्रभाव टाकणारा नाही का? या प्रश्नांची उत्तरं मात्र कोणाकडेच नाहीत.
सध्या कार्तिक हा पवित्र महिना सुरु असताना आणि या महिन्यात भगवान श्रीकृष्णांनी वेगवेगळ्या अलौकिक लीला केल्या असताना सुसंस्कृत नेतृत्व मात्र मतदारांना मटणाच्या जेवनाची मेजवानी देत आहे, यापेक्षा या तालुक्याचं आणखी दुर्दैव कोणतं, असा सर्वांनाच अंतर्मुख करणारा हा प्रश्न आहे.
सुसंस्कृत नेतृत्वाचे कार्यकर्ते मात्र वेगळ्याच विश्वात…!
समोरचे ‘ते’ दोघे दुबळे उमेदवार असून आमच्याच तालमीत तयार झालेले आहेत. त्यांना लोकांचा किती पाठिंबा आहे, याची आम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे. ‘ते’ दोन दुबळे उमेदवार एकमेकांची मतं खाऊन पराभूत होतील आणि या निवडणुकीत आम्हीच गुलाल उधळणार आहोत, अशी उघड चर्चा सुसंस्कृत नेतृत्वाच्या कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळत आहे. वेगळ्याच विश्वात असलेले सुसंस्कृत नेतृत्वाचे हे कार्यकर्ते आणि सुसंस्कृत नेतृत्व या तालुक्याला कुठे घेऊन जाणार आहे, हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे.