रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहमदनगर
नेवासे तालुक्यातल्या अमोल उर्फ तुका दरंदले (रा. ए- 1 फ्लॅट नंबर 11, मंगल मारुती हाऊसिंग सोसायटी बजाजनगर औरंगाबाद)
आणि सचिन (पूर्ण नाव माहीत नाही) (रा. बेंगळुरु, जिल्हा कर्नाटक) या दोघांनी शेअर मार्केटच्या नावाखाली लोकांना आर्थिक गुंतवणूक करायला भाग पाडलं आणि त्यांची घोर आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी कर्नाटकातल्या बंगळुरुमध्ये या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्याची ‘एफ आय आर’ची ‘कॉपी’ रोखठोक 24 न्युज नेटवर्कच्या हाती लागली आहे. वाचकांसाठी आम्ही मुद्दामहून त्या ‘एफ आय आर’चे ‘स्क्रीन शॉट्स’ देत आहोत.
याप्रकरणी आर्थिकदृष्ट्या फसल्या गेलेल्या चौघांनी दिलेल्या आणि कन्नड भाषेत असलेल्या फिर्यादीमध्ये याविषयी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये महेंद्र लक्ष्मण कुमार (वय ४२ रा. अनंत नगर बेंगळूर जिल्हा कर्नाटक), (व्यवसाय- फॅक्टरी कामगार), देवेंद्र शर्मा (वय 45 फॅक्टरी कामगार, रा. बंगळूरु शहर, जिल्हा कर्नाटक), जीवन एम. सी. (वय ५२, रा. बंगळूर शहर, जिल्हा कर्नाटक) आणि रमय्या पुष्पा गुट्टा (वय – ३२ गृहिणी रा. बंगळूरु शहर, जिल्हा कर्नाटक) या चौघा फिर्यादींचा समावेश आहे.
दरम्यान, या चौघांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधार्थ तपासाची चक्रे फिरवायला सुरुवात केली आहे. सोनईच्या ‘तुका’चा शोध घेण्यासाठी बंगळूरु (कर्नाटक) पोलीस कधीही सोनईला येऊन धडकण्याची शक्यता आहे.
काय करताहेत सोनईचे पोलीस…?
कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे आर्थिक गुंतवणूकदार खडबडून जागे झाले आहेत. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना यापूर्वीच निवेदन देण्यात आलं आहे. त्यानुसार संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. एवढं सगळं होऊनही बेपत्ता ‘तुका’चा शोध घेण्यात सोनई पोलिसांना अद्यापपर्यंत यश आलेलं नाही. त्यामुळे सोनईचे पोलीस नक्की काय करताहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.