बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
नेवासे तालुक्यातल्या सोनई आणि शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून ‘चोर आले’, ‘चोरट्यांनी बॅटऱ्या चमकविल्या’, ‘इलेक्ट्रिक मोटारीचं ‘खोकं’ उचकटवलं’, काही ठिकाणी ‘पत्रे वाकवले’, ‘अमक्याला मारहाण केली’, ‘तमका तिकडं पळाला’, ‘१२ चोरटे गाडीतून आले’, ‘शनिशिंगणापुरातल्या तरुणांनी चोरट्याला पळताना पाहिलं, त्याच्या पायाचे ठसेदेखील दिसले’, ‘खरवंडीत चोरी झाली’, ‘कांगोणीत चोरी झाली’, अशा प्रकारच्या नुसत्या चर्चाच ऐकायला मिळत आहेत. प्रत्यक्षात कुठं मोठी धाडसी चोरी किंवा दरोडा झाल्याच्या घटनांची नोंद या दोन्हीही पोलीस ठाण्यांत करण्यात आलेली नाही.
या संदर्भात सोनई आणि शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता पोलीस म्हणताहेत, ‘हद्दीत शांतता आहे. या सर्व अफवा आहेत. ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये. फक्त काळजी घ्यावी आणि जागरुक रहावं’. दरम्यान, या दोन्हीही पोलीस ठाण्याच्या पोलिसांची रात्रीची गस्त सुरु असली तरी ठिकठिकाणच्या गावांतल्या तरुणांनी एकत्र येऊन ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्याची आवश्यकता आहे.
‘गडबड’ आढळल्यास 112 ला फोन करा…!
चोरटे आल्याच्या नुसत्याच अफवा पसरविण्याऐवजी चोरट्यांपासून स्वतःची आणि कुटुंबियांची सुरक्षा कशी करायची, यावर खरं तर गांभीर्यानं विचार होण्याची गरज आहे. मात्र आज काल शहाणी आणि जबाबदार माणसं स्वतः घाबरतात आणि इतरांनाही घाबरवून देताहेत. खरंच चोरटे आले आणि कोणाला मारहाण करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला तर काहींनी गुपचुपपणे 112 या पोलीस सुरक्षा नंबरवर संपर्क साधावा, असं आवाहन सोनई, शनिशिंगणापूर पोलीस आणि रोखठोक 24 न्युज नेटवर्कच्यावतीनं देण्यात येत आहे.
खाली पडलेलं ‘ते’ ड्रोन नक्की कोणाचं? नेवासा पोलिसांचा शोध सुरु…!
दरम्यान, काल (दि. ५) एक ड्रोन उडत असताना खाली पडलं. जागरुक ग्रामस्थांनी ते ड्रोन पोलिसांच्या ताब्यात दिलं.
नेवासा तालुक्यातल्या भेंडा, कुकाणा या परिसरानजीक असलेल्या लांडेवाडी परिसरात ही घटना घडली. या संदर्भात नेवासा पोलीस ठाण्याचे पी.आय. धनंजय जाधव यांच्याशी चर्चा केल्या असताना त्यांनी सांगितलं, की ‘खाली पडलेले ड्रोन आम्ही जप्त केलं आहे. ते कोणाचं आहे, कोणत्या कंपनीचं आहे, सदरचं ड्रोन उडविण्यासाठी पोलिसांची रीतसर परवानगी घेण्यात आली होती का, या आणि इतर सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा आम्ही शोध घेत आहोत’.
ड्रोन आणि चोरीचा संबंध नाही, हे झालं पुन्हा एकदा सिद्ध…!
रात्रीच्या वेळी आकाशात अनेक ड्रोन्स उडताहेत. त्या ड्रोन्सबद्दल ग्रामस्थांमध्ये अनेक प्रकारच्या गंमतीशीर अफवा ऐकायला मिळत आहेत. ड्रोनद्वारे आपल्या घरातला पैसा आणि सोनं कुठं आहे, चोरांना कळतं. त्यामुळे धाडसी चोरी किंवा दरोडा पडू शकतो, अशी भीती ग्रामस्थांमध्ये पसरली होती. परंतु ड्रोन आणि चोरीचा किंवा चोरट्यांचा काहीही संबंध नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. अर्थात नेवासा पोलिसांच्या तपासानंतर या संदर्भातल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं नेवासकरांना मिळणार आहेत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पोलिसांना सहकार्य करा, असं आमचं सातत्यानं आवाहन आहे.