रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल (दि. २०) सायंकाळी ‘लटकूं’मध्ये प्रचंड हाणामारी झाली. पोलीस कर्मचाऱ्यासह काही जण या घटनेत जखमी झाले. यावेळी शनिशिंगणापूर परिसरात मोठी गर्दी झाली होती. या गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. दरम्यान, या हाणामारीच्या घटनेमागं वाहन पार्किंगचं कारण स्थानिक पोलीस देत असले तरी या घटनेला जुन्याच वादाची किनार आहे.
शनिशिंगणापूरच्या वाळू व्यावसायिकांच्या वाहनांना सोनईतल्या काही तरुणांनी प्रवेश बंदी केली होती. अर्थात सोनई आणि शनिशिंगणापूरच्या तरुणांमधला हा तसा जुनाच वाद आहे. मात्र या जुन्या वादावरुन शनिशिंगणापूरच्या कुऱ्हाट आणि सोनईच्या काही तरुणांमध्ये प्रचंड वाद झाले. त्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं.
या हाणामारी प्रकरणी शनिशिंगणापूर पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. अटक सत्र अजूनही सुरुच असून जोपर्यंत शनिशिंगणापूरमध्ये शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत या घटनेत सहभागी असलेल्या सर्वांनाच अटक करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं शनिशिंगणापूरचे पोलीस निरीक्षक टेंभेकर यांनी सांगितलं.
शनिशिंगणापूरच्या या हाणामारीच्या घटने संदर्भात माहिती मिळताच अहिल्यानगरचे एसपी राकेश ओला यांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरहून पोलिसांच्या अनेक तुकड्या शनिशिंगणापूरला रवाना करण्यात आल्या. काल (दि. २०) संध्याकाळी उशिरापर्यंत शनिशिंगणापूरच्या अनेक रस्त्यांवर शुकशुकाट होता. हाणामारीच्या या घटनेमुळे शनिशिंगणापूर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.