रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
केंद्रीय निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीची घोषणा नुकतीच एका पत्रकार परिषदेद्वारे केलीय. येत्या दिनांक 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे तर तीन दिवसांनी अर्थात 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रात एकाच टप्प्यात होणार आहे. दरम्यान, आज पासून महाराष्ट्रात आचारसंहिता लागू करण्यात आल्याची घोषणादेखील निवडणूक आयोगानं केली.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एक लाख 186 मतदान केंद्र असणार आहेत. 9 कोटी 3 लाख मतदार निवडणुकीत मतदान करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं, असं आवाहन निवडणूक आयोगाने केलं आहे. मतदारांना कसलीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निवडणूक आयोग कटिबद्ध राहणार आहे. मतदारांच्या रांगेमध्ये खुर्च्या ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे मतदारांना काहीसा आराम मिळेल.
मतदान केंद्रावर जाऊ न शकणाऱ्या मतदारांसाठी घरातूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्फत ‘व्होटर ॲप’ ‘डेव्हलप’ केलं जाणार असून त्याद्वारे मतदार स्वतःची सर्व माहिती पाहू शकणार आहेत. बूथ कुठं आहे, याचीदेखील माहिती या ॲपवर मिळणार असून उमेदवार कोण आहे याची माहितीदेखील या ॲपवर मिळणार आहे.
दारु आणि पैसे वाटपावर करडी नजर राहणार…!
विधानसभा निवडणुकीदरम्यान काही उमेदवारांकडून मतदारांना मतदानासाठी पैसे दार, मटण अशी प्रलोभनं देण्यात येतात. त्यामुळे निवडणूक आयोगाच्यावतीनं दारु, पैसे वाटप आणि मटणाच्या पार्ट्या यावर करडी नजर ठेवली जाणार असून पोलिसांसह सर्व अधिकाऱ्यांची यावर कडक लक्ष असणार आहे.