अहिल्यानगर... तर मग कोतवाली पोलिसांनी केडगाव बायपासचा तो 'फिक्स पॉईंट' बंदच करावा...

… तर मग कोतवाली पोलिसांनी केडगाव बायपासचा तो ‘फिक्स पॉईंट’ बंदच करावा ; प्रवाशांमध्ये कुजबूज…!

Published on

spot_img

कोतवाली पोलीस ठाण्यातल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तीन वर्षांत साप्ताहिक सुट्टी आणि हक्काची रजा न घेता सातत्यपूर्ण ‘विशिष्ट प्रकारची सेवा’ केल्याची बातमी रोखठोक 24 न्युज नेटवर्कनं प्रसारित केली होती. या बातमीनंतर सलग तीन दिवस कोतवाली पोलीस ठाण्यातल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु होती. काहींचं म्हणणं असं होतं, की केडगाव बायपासच्या ‘फिक्स पॉईंट’वर कोणताही पोलीस कर्मचारी ड्युटी करायला तयार नाही. जर अशी परिस्थिती असेल तर कोतवाली पोलिसांनी केडगाव बायपासचा तो ‘फिक्स पॉईंट’ बंदच करावा, अशी कुजबूज प्रवाशांमधून ऐकायला मिळाली.

पोलीस कर्मचाऱ्यांना जनतेच्या संकलित करांमधून सरकार घसघशीत पगार देत असतं. मिळणाऱ्या पगाराच्या मोबदल्यात वरिष्ठ सांगतील, तिथं काम करायला पोलीस कर्मचाऱ्यांनी कशासाठी टाळाटाळ करावी? यासाठी जर मनुष्यबळाचा प्रश्न उपस्थित होत असेल तर कोतवालीच्या वरिष्ठांनी हा ‘फिक्स पॉईंट’ बंद करावा. केडगाव बायपासच्या या ‘फिक्स पॉईंट’वर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे किंवा महामार्ग विभागाचे पोलीस थांबतील, असादेखील एक मतप्रवाह यानिमित्तानं पाहायला मिळतो.

नगर शहरात विशिष्ट वेळेत अवजड वाहनं येऊ नयेत, यासाठी केडगाव बायपास, शेंडी बायपास, विळद बायपास असे ‘फिक्स पॉईंट’ देण्यात आले आहेत. मात्र या ‘फिक्स पॉईंट’ वरुन ‘चिरी मिरी’ घेऊन अवजड वाहनं शहरात बिनदिक्कतपणे सोडले जातात, अशी उघड चर्चा ऐकायला मिळत आहे. परिणामी शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, वयोवृद्ध व्यक्ती, महिला यांना जीव गमवावा लागतो.

एकीकडे, पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा अभाव असल्याची कारणं सांगितली जातात. मात्र दुसरीकडे असे केडगाव बायपासवर वर्षानुवर्षे तेच तेच पोलीस कर्मचारी नेमण्यामागे ‘ड्युटी अंमलदारा’चा नक्की हेतू काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, हे पोलीस रस्त्याच्या मध्यभागी उभे राहतात आणि पुण्याहून छत्रपती संभाजीनगरकडे किंवा छत्रपती संभाजीनगरहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना अडवतात. यामुळे या परिसरात बराच वेळ वाहतूक कोंडी होते. कधी कधी वाहनं एकमेकांना धडकून किरकोळ अपघातदेखील होतात.

भरधाव वेगाने जात असलेल्या वाहनांचा वेग नियंत्रित न झाल्यामुळे वैतागलेले अवजड वाहनांचे वाहन चालक रस्त्याच्या मध्यभागी उभे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहनं घालण्याची हिंमत करतात. अशावेळी हे पोलीस इतरत्र पळाल्यामुळे त्यांचा जीव वाचतो. विशेष म्हणजे या परिसरात अशा घटना घडलेल्या असून प्रत्यक्षदर्शी याबद्दल वेळोवेळी सांगत असतात. अर्थात याचं गांभीर्य जर कोतवाली पोलिसांना असेल तर केडगाव बायपासवरच्या ‘फिक्स पॉईंट’ संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा या परिसरात ये – जा करणाऱ्या प्रवाशांमधून व्यक्त केली जात आहे. 

आणखी महत्वाच्या बातम्या