बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. तारीखही जाहीर झाली. मतदान कधी आणि निकाल कधी, हे सुद्धा जाहीर झालं. मात्र जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटायला तयार नाही. त्यामुळे इच्छुकाची प्रचंड प्रमाणात घालमेल होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र नेवासे विधानसभा मतदारसंघात मात्र सध्या वादळापूर्वीची शांतता पाहायला मिळत आहे.
राज्यातल्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन सध्या प्रचंड रस्सीखेच सुरु आहे. महायुतीने काही उमेदवारांशी घोषणा केली असली तरी उर्वरित मतदारसंघात मात्र अद्यापही चित्र स्पष्ट झालं नसल्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघ भाजपकडे राहतो की शिंदे गटाकडे जातो, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. मात्र या वेळच्या निवडणुकीत केवळ ‘विनिंग कॅंडिडेट’च द्या, अशा स्पष्ट सूचना भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी दिल्या आहेत.
… तरच नेवाशात होईल ‘कांटे की टक्कर’…!
स्वतंत्र नेवासे विधानसभा मतदारसंघ भाजपकडे राहिल्यास नवीन चेहऱ्याला संधी मिळणार, अशा चर्चा यापूर्वीच ऐकायला मिळालेल्या आहेत. मात्र हा मतदार संघ शिंदे गटाला देण्यात आल्यास पंचगंगा सीड्स उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा प्रभाकर काका शिंदे
हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान विद्यमान आमदार शंकरराव गडाखांना
खंबीरपणे लढत देण्याची धमक प्रभाकर काका शिंदे यांच्यातच असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर गडाख विरुद्ध शिंदे अशी लढत झाली तरच स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघात ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळणार असल्याचं सगळीकडे बोललं जात आहे.